आभाळाहून मोठा तो बाप !
This is a Marathi transliteration of my post written on Baba’s birthday in June 2021.
आभाळाहून मोठा तो बाप !
आज १२ जून, २०२१! आज बाबा असते तर ते बरोब्बर ८१ वर्षांचे झाले असते! ८१ वा वाढदिवस! प्रथेप्रमाणे, या दिवशी सहस्त्रचंद्रदर्शन सोहोळा साजरा करतात. खगोलीय गणीतानुसार, ८१ वर्षात व्यक्तीच्या आयुष्यात एक हजारवेळा पुनवेचा पूर्णचंद्र येऊन जातो! आणि ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हा एक हजार वेळा पौर्णिमा पाहण्याचा दुर्मिळ योग येतो, तिचे सारे कुटुंबीय “सहस्त्रचंद्रदर्शन” सोहोळा अत्यंत अस्थापूर्वक साजरा करतात!
आज माझ्या मनात जणू सहस्त्रावधी विचारांचा, आठवणींचा पूर ओसंडून वाहतो आहे!
एक गोष्ट मात्र खरी की बाबा पूर्णचंद्रासारखे ऊर्जा आणि उत्साहाने ओतप्रोत असे आयुष्य जगले! ही त्यांची आंतरिक उर्मी कोणत्याही कौटुंबिक किंवा मित्रपरिवाराच्या स्नेहसंमेलनाला पौर्णिमेच्या चंद्रा सारखी उजाळवून टाकत असे.
असे असले तरी, बाबांच्या एकंदरीत आयुष्याचा प्रवास मात्र चंद्रप्रकाशा सारखा शीतल आल्हाददायक नव्हता! बाबांचे वय अवघे दीड वर्षे होते तेंव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. इतक्या लहान वयात पितृछत्र गमावणे म्हणजे टळटळीत दुपारी रणरणत्या वाळवंटात अनवाणी चालणेच जणू! पण हीच गोष्ट त्यांना आयुष्यात कणखर, दृढ मन:शक्तिचे वरदान देऊन गेली! बुद्धीस्वातंत्र्य आणि स्वप्रयत्नाने पुढे जाण्याचे बाळकडू देऊन गेली!
अनेक वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आलेले वाक्य – “आभाळहून मोठा कोण? बाप!” माझ्या मनावर ते सत्य लहानपणीच कोरले गेलेले आहे आणि आज, या दिवशी माझ्या मनात, भावविश्वात हे वाक्य सोसाट्याने घोंघावते आहे!
योगायोगाने, माझ्या बाबांचा वाढदिवस आणि दर वर्षी जगभर साजरा केला जाणारा “पितृ दिन” (Father’s Day) एकमेकांच्या अगदी जवळ, आठवड्या भरातच येतात! या वर्षीचा Father’s Day मात्र खूप वेदनादायक असेल. या वर्षांपर्यंत बाबांच्या शिवाय कधीच जगले नव्हते ना !
आज या संध्याकाळी त्यांच्या आठवणी जागवताना, या माझ्या बाबांनी आम्हाला, त्यांच्या मुलांना आयुष्यात कोणत्याही झळा सोसाव्या लागू नये यासाठी कसोशीने केलेले परिश्रम आठवतात. आमच्या पाऊलवाटेवर नेहमीच आल्हाददायक चंद्राने पाखर धरावी म्हणून बाबांनी केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट मला प्रकर्षाने आठवतायत!
तो १९८३ चा मार्च महिना होता. माझी, माझ्या शैक्षणिक कारकिर्दीचे भवितव्य ठरवणारी, १२ वीची बोर्डाची परीक्षा सुरू होती. काहीही झाले तरी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवायचाच या ईर्षेने मी भौतिक – रसायन – जीवशास्त्र या विषयांचा कसून अभ्यास केला होता. १० वीच्या परीक्षे नंतर मला गणित विषयात कोणतीच रुचि उरलेली नव्हती ! कॅलकुलस, डिटर्मिननटस, स्टॅटिस्टिक्स ही मंडळी म्हणजे माझ्या लेखी परग्रहावरचे कोणी दैत्यच होते जणू! आणि मी तर परीक्षेच्या शेवटच्या पंधरवड्याच्या उंबरठ्यावर उभी होते. उत्तम गेलेल्या भौतिक – रसायन – जीवशास्त्र या विषयांचे पेपर आणि छान लिहिलेले इंग्रजी मराठी पेपर अशा सुखद झुळुकेवर मी जणू तरंगत होते! आता फक्त गणित-१ आणि गणित-२ या विषयांचे पेपर संपले की सुटले बाई एकदाची! प्रत्येक पेपर ५० गुणांचा. पास होण्यासाठी दोनही मिळून ३५ गुण मिळवले की झाले!
आणि एकदम कुठूनशी “त्या” दैत्यांच्या आठवणीने माझी पार घाबरगुंडी उडाली! या पेपरांच्या वेळेस आता मला काहीच आठवणार नाही असे वाटू लागले. मला काहीच आठवले नाही तर? या विचाराने मी पार नाउमेद झाले, माझी झोप उडाली. मला तर रडूच येऊ लागले. आणि मी एक मूर्ख विचार बोलून दाखवला. “मी पुढचे उरलेले दोन पेपर देणार नाही!”
माझ्या ह्या ‘रणछोड’ मनस्थिति बाबत बाबांनी माझे शांतपणे ऐकून घेतले. आणि त्यानंतर ते जे बोलले ते माझ्या मेंदूत कायमचे कोरले गेले आहे!
“तू परीक्षेला गेलीस तर तू नापास होण्याची शक्यता ५० टक्के आहे! आणि समजा तू पेपर दिलेसच नाहीस, तर मात्र तू नापास होण्याची शक्यता अगदी १०० टक्के आहे!”
त्यामुळे, शेवटी कसाबसा मनाचा हिय्या करून, माझ्या नशिबाचा कौल कोणत्या बाजूने लागतोय ते पाहायला मी परीक्षेला जाण्याचे ठरवले. आणि अहो आश्चर्यम! मला पास होण्यासाठी हवे होते फक्त ३५ मार्क्स आणि मिळणार होते चक्क ५० पैकी ४० !
त्यामुळे पुनः एकदा मनात विचार आला, आता गणित -२ चा पेपर नाहीच दिला तर काय होणार आहे एवढे ?
पण बाबांचे ते शब्द माझ्या कानात पुनःपुन्हा घुमले! काय बिशाद होती माझी परीक्षा चुकवण्याची? परत एकदा धीर एकवटून मी शेवटचा पेपर द्यायला गेले. अगदी तो पेपर मी कसा सोडवीन या बाबत कोणतीही खात्री नसताना. आणि या वेळी सरळ ५० पैकी ३५ गुणांची कमाई झाली!
दोन एक महिन्यांनंतर एकदाचा परीक्षेचा निकाल हाती आला. वैद्यकीय प्रवेशासाठी भौतिक – रसायन – जीवशास्त्र या गटात मला एकूण ९७.५ टक्के इतके घसघशीत मार्क मिळाले होते. आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! भौतिक – रसायन – गणित या गटातही मला एकत्रित गुण मिळाले होते ९० टक्के! म्हणजे मला अभियांत्रिकीलाही प्रवेश मिळू शकला असता! अर्थातच, मला ‘त्या’ परग्रहवारील दैत्यांबरोबर लढाई करीत बसण्याची कोणतीही हौस अजिबात नव्हती! ही सर्व हकिगत अविश्वसनीय अशीच होती. माझा माझ्या क्षमतेवर विश्वास नव्हता; पण माझ्याजवळ होते माझे बाबा; आणि त्यांचा माझ्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास होता ना !!
मी आज तुम्हाला हा एक लहानसाच प्रसंग सांगितला आहे. पण खरे तर आत्ता या क्षणी, बाबांच्या सान्निध्यात घालवलेल्या आयुष्याचा, प्रत्येक क्षणाचा एक प्रदीर्घ चित्रपटच माझ्या डोळ्यांसमोरून सरकतो आहे.
बाबा नसते तर माझे जीवन कसे असते? जीवनाच्या या टप्प्या पर्यंतचा यशस्वी प्रवास बाबांचा हात धरूनच तर शक्य झाला ना! आणि उर्वरित प्रवास पार पाडण्यासाठी ताकदही बाबांकडूनच मिळाली आहे. यापुढे कधी कधी खूप एकटे पडल्या सारखे वाटणार आहे, पण बाबांनी गिरवून घेतलेले धडे आणि त्यांच्या आठवणी यांमुळे जीवन पुनःपुन्हा समृद्ध होणार आहे.
बाबा, वाढदिवसा निमित्त मनःपुर्वक अभिष्ट चिंतन! तुम्ही माझ्या हृदयात नेहमीच असता ! मला सारखे वाटतेय बाबा, फक्त आजचे सहस्त्रचंद्र दर्शन करायलाच नाही, खरं तर अजून अनेकोअनेक वाढदिवस साजरे करायला तुम्ही हवे होतात . . . .
- डॉ. माधवी रिसबुड (जोशी)
---०००---
This transliteration to Marathi from my original English tribute to Baba was done with much kindness and patience by my friend Adv. Vijay Patankar who has been close to my parents for several decades. I am posting it for the convenience of Baba’s friends who may find Marathi more familiar to read. 🙏🏼🙏🏼
Comments
Post a Comment