एका गगनभरारीची गोष्ट !




एका गगनभरारीची गोष्ट !

महिन्याभरा पूर्वी माझ्या धाकट्या बहिणीकडून मलाएक मेसेज आला. ती माझ्यापेक्षा ४-५ वर्षांनी लहान आहे, पण जन्मजात मोठी धाडसी आहे. कोलोराडो पर्वताच्या १४-१५ हजार फुट उत्तुंग शिखरावर चढाई असो, माऊंट किलीमानजारो पर्वतारोहण असो, किंवा ब्लॅक लेव्हल थरारक उतारावर स्कीईंग असो, ती म्हणजे एक व्यावसायिक वाटेल अशी खतरोकि खिलाडी आहे. असल्या धाडसी खेळांचे नुसते नाव जरी घेतले तरी मला धडकी भरते, आणि ती मला विचारात होती कीमोॲबयेथे स्काय डायव्हिंग करायला आवडेल का? अगदी एक क्षणही न दवडता मी लगेच उत्तर पाठवले  ‘माझ्या मुलांना अजून माझी खूप गरज आहे!’ यावर तिने विचारले की जर तिने स्काय डाईव्ह करायचे ठरवले तर मला चालेल ना? मी तिला स्पष्टच सांगितले की हा बेत तिने पुढे कधीतरी करावा. मला या सफरीत आपण सर्वजण सुखरूप असायला हवे आहोत !! ती यावर काही बोलली नाही, पण नक्कीच तिचा हिरमोड झाला होता. तिच्या नावऱ्याचाही प्रतिसादही असाच थंडा होता, अगदी माझ्या सारखा.    

यूटाहला जाण्यापूर्वी एक आठवडा अगोदर आम्ही माझ्या नणंदेच्या घरी सॅन डीएगो येथे गेलो होतो. तेंव्हा गप्पांच्या ओघात आमची आगामी यूटाह ट्रीप आणि तिथे माझ्या बहिणीला स्काय डाइव करायची हौस आली आहे वगैरे बोलत होतो. 

 

त्यावर नणंदेचे यजमान लगेच म्हणाले  ‘माधवी तू स्काय डाइव करच. तो अनुभव तुला अंतर्बाह्य बदलून टाकेल!’  

त्यांनी तो अनुभव वयाच्या सत्तरीत घेतलेला होता. त्यांच्या स्काय डायव्हिंग व्हिडिओ त्यांनी आम्हाला दाखवला आणि त्यांचा त्याबाबतीतील अनुभवही सांगितला. ते सर्व बघून, ऐकून माझा नूर एकदम बदलला. 

मी बहिणीला कळवले  करूया आपण स्काय डायव्हिंग! मग मी तिच्या नावऱ्यालाही सांगितले  मी हे धाडस   करू शकत असेन तर तुम्हीही करायला काय हरकत आहे? मग तेही यात सामील व्हायला तयार झाले. बहिणीने पडत्या फळाची आज्ञा समजून तात्काळ बुकिंग करून सुद्धा टाकले!

बुकिंग पक्के झाले मात्र, आणि लगेचच मी हे धाडस पारंपरिक साडी नेसूनच करण्याचा निर्धार केला.  इतक्या उंचीवरील हवेच्या झोतात पांचवारी साडीचा घोळ वर उडण्याची भीती होती. मग काय चांगली चापुन चोपून घट्ट काष्टा अशी नऊवारी साडी नेसणे हाच पर्याय होता. माझ्या अन्य साड्यांबरोबरच मी एक नऊवारी साडीही प्रवासाच्या सामानात ठेवली! 

 

 

६ सप्टेंबर  श्रमिक दिवस  हा मुहूर्त पक्का झाला होता. त्यापूर्वी एकच दिवस आधी मी बहिणीला सांगितले की, “मी हा थरार साडी नेसूनच अनुभवणार आहे. माझ्या बहिणीला ती भन्नाट कल्पना बिलकुल आवडली नाही. ‘मुळीच जमणार नाही’ हा तिचा प्रतिसाद. मी माझा बेत माझ्या मुलीच्याही गळी उतरवायचा प्रयत्न केला, पण तिनेही त्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. आणि माझ्या मुलानेही तिचीच री ओढली. इतके होऊनही मी माझ्या पाठीवरच्या पिशवीत माझी साडी आणि एक ब्लाऊज त्या सर्वांच्या नकळत कोंबलाच! पाहूया, जमलं तर जमलं!

ज्या खासगी विमानतळावरून आयोजक कंपनी हे स्काय डायव्हिंगचे आयोजन करत असे तिथे आम्ही ठीक आठ वाजता पोहोचलो. हा थरार अनुभवताना अपघाताने आम्हाला काही इजा वगैरे झालीच तर त्याची जबाबदारी आयोजकांवर नसेल अशा आशयाचा लेख आम्ही आयोजकांना आधल्या रात्रीच लिहून दिला होता. शिवाय आम्हाला स्काय डाइव बाबत एक व्हिडिओ सुद्धा दाखवण्यात आला होता. त्यातील प्रदर्शकाने एक विशेष प्रकारचा सूट परिधान केला होता. मला वाटले तसाच पेहेराव करणे या कार्यक्रमासाठी सक्तीचे असेल.  

विमानतळावरील त्या विभागात आम्ही एकामागून एक चमू विविध साधन सामग्रीसह तयार होताना पहात होतो. प्रत्येकजण त्याच्या त्याच्या घरातून येताना परिधान केलेल्या साध्या, नेहमीच्या कपड्यातच तयार होत होता. अगदी टीशर्ट आणि ट्राउजर्स घालून! कोणताही विशेष पोशाख नव्हता. मग मी तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोलूनखातरजमा करून घेतली. त्यांनी सांगितले की तुम्ही तुमचे घरचेच कपडे घालू शकता. हे ऐकल्या ऐकल्या लगेचच मी कपडे बदलायच्या खोलीकडे गेले आणि बाहेर आले ती नऊवारी साडी नेसूनच! माझ्या बहिणीची नाराजी स्पष्टपणे दिसलीच. तेथील स्वागतिकेनेही आम्हाला बोलावून सांगितले की माझा पोशाख कदाचित असुरक्षित ठरू शकेल, त्यामुळे त्याबाबत अंतिम निर्णय प्रशिक्षकच घेईल!      

अगदी त्या क्षणापासून ते माझा नंबर लागेपर्यंत माझ्या बहिणीची भुणभूण सुरूच होती. आत्ताच्या आत्ता परत जा आणि ही साडी बदलून ‘नेहमीचे’ कपडे घालून ये. मी मात्र निग्रपूर्वक तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत राहिले. माझ्या आशा अपेक्षा सर्वस्वी प्रशिक्षक काय म्हणतोय इकडे केंद्रित झाल्या होत्या. मला या साडीतच हा थरार अनुभवायला मिळावा म्हणून मी मनातल्या मनात सारखी प्रार्थना करत होते. साडी शिवाय उडी ही माझ्यालेखी निरर्थक होती. किती व्यर्थ ठरेल ही संधी जर साडी ऐवजी रटाळ शर्ट पॅन्ट मध्ये उडी मारायची असेल तर?      

अखेरीस जेंव्हा प्रशिक्षक बाहेर आला तशी मी त्याच्या जवळ गेले आणि मनात धाकधूक असलेला तोप्रश्न मी त्याला विचारलाच. हा माझा पेहेराव ठीक आहे ना?  त्याचा पहिला शेरा होता  हा फारच ढगळ, बोंगेदार आहे आणि कदाचित धोकादायकही !” मी आपले म्हणणे रेटण्याचा प्रयत्न केला  हा वेष म्हणजे जंपसूटचाच भारतीय अवतार आहे.” मग तो म्हणाला की दोनही पायात दोन फूट अंतर ठेवून उभी रहा. आणि जेंव्हा त्याच्या लक्षात आले की यात कोणतीच अडचण नाहीये तेंव्हा एकदाचा त्याने या पोषाखाला हिरवा झेंडा दाखवला! माझ्या आनंदाला पारावार राहीला नाही आणि मघापर्यंत असलेली धाकधूकही संपली. आता माझी बहीण एकदम निरुत्तर झाली. देवांनीच कौल दिला होता ना!       

मी या साहसातील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेण्याचा प्रणच केला होता. जशी या कार्यक्रमातील आमची पाळी आली तेंव्हा आमच्या अंगाभोवती वेगवेगळे पट्टे जखडण्यात आले आणि डोळ्यांवर विशिष्ट गॉगलचे  झापड  लावण्यात आले. आमच्या प्रशिक्षकाने आणि व्हिडिओग्राफर यांनी आम्हाला त्यांची ओळख करून दिली आणि ते आमच्या समवेत विमानापर्यन्त आले.   

विमान हवेत झेपावले आणि काही क्षणात आम्ही उंच आकाशात पोहोचलो देखील. १३,५०० फुटांची ऊंची गाठायला सुमारे तिसएक मिनिटे लागली असतील.  आम्हा तिघांपैकी माझा नंबर पहिला होता. मी आणि प्रशिक्षक जवळजवळ घसरतच विमानाच्या सताड उघड्या दरवाजा पर्यन्त पोहोचलो, आणि धडाम! काहीवेळ पुढे मागे हेलकावे घेत आम्ही एकदम खुल्या आकाशात झेपावलो.  प्रशिक्षकाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करीत मी अंगाभोवती बांधलेले पट्टे घट्टधरून ठेवले, अगदी अंतराळात हात पसरून ठेवण्याबद्दल सूचना मिळे पर्यन्त. बाहेरचा वारा गोठवून टाकेल इतका झोंबरा थंड होता, पण माझे डोळे मात्र आजूबाजूचे विहंगम दृश्य टिपण्यात व्यग्र होते, तल्लीन झाले होते. आम्ही हवेतच काही का गरगर गिरक्या घेतल्या, आणि पॅरॅशूट उघडेपर्यंत, खाली डोके वर पाय या अवस्थेत खाली खाली जात राहिलो. आणि बघता बघता आम्हीमोॲब च्या परिसरावर तरंगू लागलो. त्याक्षणी, दररोजच हा आनंद लुटणाऱ्या पक्षांचा मला खूपच हेवा वाटला. मी जेंव्हा त्या आकाशातील उंच भरारीचा अनुभव आणि आनंद आकंठ पिऊन घेत होते, त्यावेळेस आम्ही दर तशी १२० मैल इतक्या भरमसाठ वेगाने जमिनीकडे जात होतो. जेमतेम ३ - ४ मिनिटातच आमचे पाय जमिनीला लागले देखील. आयुष्यात क्वचितच मिळणारा हा दुर्मिळ थरारक अनुभव जणू माझ्या मेंदूवर कायमचाच कोरला गेला आहे!

 

(ताजा कलम –  

मग आम्ही साळसूदपणाचा आव आणून आमच्या,विमानातून १३ - १४ हजार फुटांवरून मारलेल्या त्या डीची बित्तमबातमी आणि आमचे क्षेमकुशल आमच्या आईला अगदी सहज म्हणून कळवले!)  

 

डॉक्टर माधवी रिसबूड. 

Comments

Popular Posts